राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा २०२२दिव्यांग, मास्टर्स, ज्युनियर गटांमध्ये स्पर्धा

मुंबई : मानाची “दिव्यांग, मास्टर्स, ज्युनियर महाराष्ट्र श्री” ही राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने व खारघरचा राजा यांच्या विद्यमाने तसेच विजयशेठ पाटील यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता खारघरचा राजा स्केटींग हॉल अॅकेडमी, आई माता मंदीर, सेक्टर ५, खारघर, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. आपल्या जिल्हयातील सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेसाठी पाठवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन अध्यक्ष प्रशांत आपटे आणि सरचिटणीस विक्रम रोठे यांनी केले आहे.
ज्युनियर महाराष्ट्र श्री विभागात १) ५५ किलो २) ६० किलो ३) ६५ किलो ४) ७० किलो ५) ७५ किलो ६) ७५ किलो वरील, मास्टर्स महाराष्ट्र श्री विभागात १) ४० ते ५० वय वर्षे अ) ८० किलो पर्यंत ब) ८० किलोवरील २) ५० ते ६० वय वर्षे अ) ६० किलो वरील तसेच दिव्यांग महाराष्ट्र श्री विभागात १) ६० किलो २) ६० किलो वरील अशा गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
प्रत्येक स्पर्धकासाठी रूपये १०० प्रवेश शुल्क आकारले जाईल. ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेमध्ये २२ फेब्रुवारी २००१ व नंतर जन्मलेल्या स्पर्धकांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल. मास्टर्स महाराष्ट्र श्री स्पर्धेमध्ये २२ फेब्रुवारी १९८२ व पूर्वी जन्मलेल्या स्पर्धकांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल. दिव्यांग महाराष्ट्र श्री विभागात जे खेळाडू कंबरेखाली शारीरिकरीत्या अक्षम असतील किंवा कंबरेखाली वैद्यकीय अपंगत्व आले असेल अशा शरीरसौष्ठवपटूंना स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी दिली जाईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके व १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविले जाईल.
अहमदनगर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव मनोज गायकवाड हे ह्या स्पर्धेत पंचांची भूमिका पार पाडणार आहेत. त्यांचे वडिल मधुकर गायकवाड ह्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करण्यात आला होता.मयूर दरंदले, डेव्हिड मकासरे हेदेखील पंच म्हणून कामगिरी बजावणार आहेत. सर्व स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक, व्यवस्थापक यांनी शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ पर्यंत स्पर्धा स्थळी पोहचून सहकार्य करावे. सर्व शरीरसौष्ठवपटूंनी वजन तपासणीपूर्वी आपल्या वयाचे पुरावे म्हणून म्हणून पॅन कार्ड / आधार कार्ड / पासपोर्ट यांपैकी कोणतेही दोन पुरावे मुळ प्रत व झेरॉक्स प्रतीसह वजन तपासणी दरम्यान सादर करावेत. महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन व इंडीयन बॉडी बिल्डर्स फेडरेशन हे उत्तेजक मुक्त शरीरसौष्ठव खेळ वाढविण्यासाठी वचनबध्द आहेत, याची स्पर्धेशी निगडित सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रशांत आपटे आणि विक्रम रोठे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com