मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे पार्वती मेन्शन या बिल्डींगमध्ये एका माथेफिरुने एकाचवेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. जयेंद्र मेस्त्री, ईला मेस्त्री आणि जेनील ब्रम्हभट अशी मृतांची नाव आहेत. तर चेतन गाला असं आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावात आणि रागाच्या भरात हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. मयत पती-पत्नी हे आरोपीच्या शेजारीच राहत होते आणि त्यांच्यामुळेच आपले स्वत:चे कुटुंब सोडून गेलं या तणावात आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झालाय तर एका महिलेची प्रकती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. डी.बी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.