आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन

या देशातील असंख्य पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांच्या केलेल्या त्यागाची आठवण कायम राहावी म्हणून चाणक्यपुरी या देशाच्या राजधानी दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय पोलीस स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्मारक पोलीस दलातील शहिदांनी अतुलनीय शौर्य, धाडस दाखवून केलेल्या पराक्रमाची ओळख जपेल व प्रेरणास्रोत म्हणून सतत कार्य करीत राहील. राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या तळघरात कायमस्वरूपी पोलीस संग्रहालयाची उभारणी केली गेली आहे. सदर संग्रहालयात राज्य व केंद्रीय पोलीस दले यांच्याशी संबंधित विविध साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. सदर संग्रहालयात कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले व मरणोत्तर अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांसारख्या पदकांनी पुरस्कृत केलेल्या शहिदांसाठी एक विशेष गॅलरी तयार केली जात आहे. देशात पहिल्यांदाच पोलीस या विषयावर आधारित कायमस्वरूपी राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात आले आहे. विविध पदकांच्या प्रतिकृती, सभारंभीय व कार्यरत पोशाख, टोप्या, फेटे, शिरस्त्राणे, बॅटन, कंबरपट्टे, श्वानपथकाची वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रे, घोडेस्वार पोलिसांच्या पथकांची छायाचित्रे, भारतीय पोलीस कायद्याच्या जुन्या प्रती, महिला पोलीस पथकांची छायाचित्रे, वृत्तपत्रांमधली पोलिसांशी संबंधित ऐतिहासिक महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे, पूर्वीपासून आतापर्यंत वापरली जाणारी वायरलेस उपकरणे इत्यादी प्रत्येक राज्यातून आणि केंद्रीय पोलीस दलांकडून मागवून संग्रहालयात प्रथमच प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com