म्हाडा कंत्राटदारावरील गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपी पश्चिम बंगालमधून गजाआड

कुर्ला गोळीबार प्रकरणी अखेर गणेश चुकल याला गुरुवारी पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. गणेश चुकलला तेथील स्थानिक न्यायालयात शुक्रवारी, २० जानेवारीला हजर करून त्याला ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन मुंबईत आणले जाणार आहे, याबाबतची माहिती कुर्ला पोलिसांनी दिली. या गोळीबारातील ही आठवी अटक असून समीर सावंत हा अद्याप फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यात येत आहे.

दहिसर येथील ठेकेदार सूरज प्रतापसिंग देवडा यांच्यावर कुर्ला पश्चिम येथे पंधरा दिवसांपूर्वी म्हाडाच्या कामाचे टेंडर मागे घेण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात देवडा हे थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी हल्लेखोरासह सात जणांना गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश चुकल आणि समीर सावंत हे फरार झाले होते, त्यापैकी गणेश चुकल हा पश्चिम बंगाल येथे दडून बसल्याची माहिती कुर्ला पोलिसांना मिळाली असता, कुर्ला पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी पश्चिम बंगाल येथे दाखल झाले आणि गणेश चुकल याला अटक करण्यात आली. चुकल याला शुक्रवारी तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपीपैकी समीर सावंत हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. गणेश चुकल याच्या अटकेमुळे म्हाडाच्या टेंडर मागे घेण्यासाठी ज्या ठेकेदाराने चुकल याला सुपारी दिली त्याचे नाव समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

म्हाडाचे कंत्राट भलत्यालाच
म्हाडाच्या ज्या कामाच्या टेंडरवरून हा गोळीबार झाला, त्या कामाचे टेंडर देवडा यांना मिळालेच नाही, ते भलत्याच ठेकेदाराला देण्यात आले आहे. वांद्रे ते दहिसर दरम्यान फुटपाथ, नाला, तसेच पायवाटच्या कामाचे टेंडर म्हाडा कडून काढण्यात आले होते. हे काम मिळविण्यासाठी सुमारे १२ कंत्राटदारांनी टेंडर भरले होते, त्यापैकी काही कारणामुळे ८ कंत्राटदारांची नावे या टेंडरमधून वगळण्यात आले होते. या कामाच्या शर्यतीत सूरज देवडा यांची धरम कन्स्ट्रक्शन ही कंपनी सर्वात पुढे होती. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी या टेंडरच्या वादातून देवडा यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हे प्रकरण कुर्ला पोलीस ठाण्यात सुरू असताना म्हाडाकडून या कामाचे टेंडर देवडा यांना न देता दुसऱ्याच कंत्राटदाराला देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com