दिल्ली आणि कोलकाता पोलिसांची ‘जामतारा रॅकेट’ प्रकरणी मोठी छापेमारी

कोलकाता : अमेरिकेच्या एफबीआय आणि इस्त्रायलच्या मोसादनेही येऊन झारखंडचे जामतारा या गावात तपास केल्याचे सांगण्यात येते. जामतारामध्ये अजूनपर्यंत देशातील असे एकही राज्य नसेल ज्या राज्यातील पोलिसांनी छापेमारी केली नसेल. आपला एक वेगळाच पॅटर्न ऑनलाईन फ्रॉडसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाने निर्माण केला आहे. आता कोलकाता पोलिसांनी कोलकाता शहराच्या शेजारी चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल, फेक डेबिट कार्ड्स, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या या छाप्यात १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

यासंबंधी कोलकाता पोलिसांच्या डिटेक्टिव्ह विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्यावर मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कोलकाता पोलिसांनी छापेमारी केली. त्यादरम्यान 16 आरोपींना अटक केली, असून हे सर्व आरोपी जामतारा, गिरिधी, धनबाद या ठिकाणचे आहेत. या आरोपींनी गेल्या काही महिन्यांपासून कोलकाता शहराच्या आजूबाजूला आपला बस्ता मांडला असून अनेकांची फसवणूक केली आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनीही मोठी छापेमारी करुन जामतारातील १४ सायबर ठगांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांची ही कारवाई महत्वाची होती कारण त्यामुळे नऊ राज्यांतील सायबर फसवणुकीचे ३६ प्रकरणांचा तपासाला गती मिळणार आहे. जवळपास दोन कोटी रुपयांची मालमत्ता आणि २० लाख रुपये दिल्ली पोलिसांनी केलेल्या या छाप्यात जप्त केले आहेत.

जेवढे काही सायबर गुन्हे आपल्या देशात होतात, त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे झारखंडमधील जामताराशी संबंधित असतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीत केवळ शालेय शिक्षण घेतलेले या गावातील तरुण हे प्रगत आहेत. त्याच्या आधारे ऑनलाईन फ्रॉड केला जातो. यावर आधारित ‘जामतारा-सबका नंबर आएगा’ या नावाची वेब सीरिज नेटफ्लिक्सने बनवली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com