मुंबई दहशतवादी अटक प्रकरणी एटीएसचा महत्त्वपूर्ण खुलासा !

मुंबई – मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यावरून मोठा गदारोळ उडाला. राज्य सरकारवर टीका करताना विरोधकांनी एटीएस झोपली होती का? असा सवाल केला असताना आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.
त्यांनी यामध्ये जान मोहम्मद शेखचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
६ लोकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक धारावीत राहणारा आहे. त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख आहे. याला फार जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याचा दाऊदच्या गँगसोबत संबंध असल्याचा इतिहास आहे. पण, आमच्याकडे या प्रकरणाची माहिती नव्हती. दिल्ली पोलिसांना ही माहिती केंद्रीय एजन्सींनी दिली. त्याने ९ तारखेला दिल्लीला जायचे नियोजन केले. त्याने १० तारखेला पैसे देखील ट्रान्सफर केले. पण त्याचे तिकीट कन्फर्म होत नव्हते. मग त्याने १३ तारखेला गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी वेटिंग तिकीट घेतले. त्याचे तिकीट संध्याकाळपर्यंत कन्फर्म झाले. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला अटक करण्यात आल्याचे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. ट्रेनने तो जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू, अशी माहिती देखील विनीत अगरवाल यांनी यावेळी दिली.
जान मोहम्मदवर कर्ज होते. तो आधी एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतलीच. त्याचा हफ्ता भरू न शकल्यामुळे बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक टू व्हीलर खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिल्याचे विनीत अगरवाल यांनी सांगितले.
कोणतीही स्फोटके, शस्त्र त्याच्याकडे नाही मिळाली. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. आज संध्याकाळी दिल्लीला आमचे एक पथक जात आहे. जान मोहम्मदची चौकशी करेल. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल, असे देखील अगरवाल यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com