आयपीएस अधिकाऱ्यांची नावे जर खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत – माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो

मुंबई – माझे वय ९२ वर्ष असून, मी अशा चौकशांसाठी समर्थ नाही. मात्र, समर्थ असतो तरी चौकशीस मी नकार दिला असता, असेही रिबेरो म्हणाले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांची नावे जर खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका उपस्थित केली असून उचलबांगडी करण्यात आल्यानंतरच का आरोप केले? अशी विचारणा केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते, असे शऱद पवार यांनी सुचवले होते. त्यावर आता ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्र्यांवर परमबीर यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासातील गोपनीय माहिती उघड होणे हा मुंबई पोलिसांचा गलथानपणा ठरतो. मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेलाही या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे धक्का बसत आहे. ही चौकशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून केली जाऊ शकते, असे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.
पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन हे थांबवावे सांगण्याची गरज होती, जर गृहमंत्र्यांनी नकार दिला असता तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. एक प्रामाणिक आणि सरळमार्गाने चालणाऱ्या अधिकाऱ्याने हेच केले असते, असेही ज्युलिओ रिबेरो यांनी सांगितले.
सचिन वाझे यांच्यावरील आरोपांबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, थेट पोलीस आयुक्तांना सचिन वाझे रिपोर्ट करत होते. मला वाटते त्यांनीदेखील आरोपांमधील वाटा घ्यायला हवा. कोणाचाही आशीर्वाद नसताना सचिन वाझे एवढे सगळे कसे काय करु शकतात? ते फक्त एसीपी आहेत, जी खूपच छोटी रँक आहे. ९२ वर्षीय ज्युलिओ रिबेरो १९८२ ते १९८६ दरम्यान मुंबई पोलीस प्रमुख होते. यानंतर ते गुजरात आणि पंजाबमध्ये आयुक्तपदी होते. आपल्या कार्यकाळात अशी कोणतीही गोष्ट घडली नसल्याचे ते म्हणाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com