बुल्ली बाई आणि सुली डील्स अँप प्रकरणातील दोन आरोपींचा सशर्त जामीन मंजूर

नवी दिल्ली – अल्पसंख्याक महिलांची अँपद्वारे बदनामी करणाऱ्या आरोपींना दिलासा मिळाला असून मानवीय आधारावर बुल्ली बाई अँप प्रकरणातील आरोपी नीरज बिष्णोई आणि सुली डील्स अॅप तयार करणारा ओंकारेश्वर ठाकूर याला जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील न्यायालयाने हा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींनी पहिल्यांदा गुन्हा केला असल्यामुळे तुरुंगवासात राहिल्यास त्यांच्यादृष्टीने हानीकारक ठरू शकते, असेही न्यायालयाने म्हटले.
काही अटी न्यायालयाने जामीन देताना आरोपींसमोर ठेवल्या आहेत. कोणत्या साक्षीदाराला न धमकावणे, पुराव्यांसोबत छेडछाड करू नये, या अटी ठेवल्या आहेत. आरोपीने कोणत्याही पीडित व्यक्तीला संपर्क करणे, त्यांना आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

आरोपीने जामीनावर असताना आपला संपर्क क्रमांक आणि वास्तव्याची माहिती अधिकाऱ्याला द्यावी. आरोपी आपला फोन कायम सुरू ठेवणार, तसेच आपल्या ठावठिकाण्याची माहिती देईल. आरोपीने देश सोडू नये आणि प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर रहावे लागेल. जामिनावर असताना आरोपीने असा गुन्हा करू नये, असेही आरोपींना बजावण्यात आले आहे.

मुस्लिम महिलांबद्दल वापरला जाणारा सुली हा अपमानास्पद शब्द आहे. सुली डील्सच्या नावाने 4 जुलै 2021 रोजी ट्विटरवर अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. अ‍ॅपवर ‘सुली डील ऑफ द डे’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत ती शेअर केली जात होती. हे फोटोही ‘गिटहब’ (Github) अ‍ॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती, पण त्यावर अनेक महिने कारवाई झाली नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com