विश्वास नांगरे-पाटील यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे तरुणांची सुटका…. तरुणीच्या खोट्या तक्रारीमुळे दोन मुलांच्या आयुष्याची वाताहत होता होता वाचली..

मुंबई : बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. फिर्यादी श्रीमती सारिया मोहम्मद साकिब सिद्दीकी,वय 19 वर्ष, व्यवसाय- गृहिणी, या तरुणीने केलेल्या वर्णनावरून दोनशेहून अधिक सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना शोधले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे तरुणांनी पोलिसांच्या दबावापोटी न केलेल्या बलात्काराची कबुली दिली होती, असे समोर आले. तरुणीच्या खोट्या तक्रारीमुळे दोन मुलांच्या आयुष्याची वाताहत होता होता वाचली आहे. धारावी बलात्कार प्रकरणातील या नव्या वळणं घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
विलेपार्लेचे रहिवासी असलेले अनिल चव्हाण (१९) व निलेश चव्हाण (२०) बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. धारावी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, १२ मे रोजी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. त्यानंतर घरात घुसलेल्या चव्हाण बंधूंनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे तोंडाला रुमाल बांधून तीला जबरदस्तीने कपडे उतरविण्यास भाग पाडले व बलात्कार केला. दोघेही एवढ्यावरच थांबले नाहीत तर एकाने या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण केल्याचा दावा मुलीने फिर्यादीत केला होता. दोघेही पळाल्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे तिने सांगितले. पोलिसांनीही तक्रारीवरून दोघांविरोधात चाकूच्या धाकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर, चव्हाण बंधूंना १६ मे रोजी अटक केली. तरुणीनेही आरोपींची ओळख पटविली. पोलिसांच्या दबावापोटी चव्हाण बंधूंनीही गुन्ह्याची कबुली दिली.
गेल्या आठवड्यात दैनंदिन कामकाज उरकून कार्यालयातून निघालेल्या सह-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अचानकपणे धारावी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस कोठडीतील दोन तरुणांकडे चौकशी केली. तेव्हा, आरोपी एखाद्या कथेच्या स्क्रिप्टप्रमाणे गुन्ह्याची कबुली देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव नांगरे पाटील यांनी टिपले. त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर थांबवले व दोघांकडे स्वतंत्र चौकशी केली. दोघांनी हबरडा फोडला, आम्ही काही केले नाही. पोलिसांच्या दबावापोटी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. नांगरे-पाटील यांचा पोलीस खात्यात क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्याचा अनुभव आणि चाणाक्ष नजरेने दोन्ही निर्दोष तरुणांच्या आयुष्याची वाताहत वाचली. पाटील यांनी तत्काळ आठवडाभरात वरिष्ठांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोलीस चौकशीत, दोघेही निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी त्यांना सोडण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com